पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये एनआयए’चे छापे, ९ अल-कायदा दहशतवाद्यांना अटक

कोलकत्ता, १९ सप्टेंबर २०२०: मुर्शिदाबाद- पश्चिम बंगाल आणि एर्नाकुलम- केरल इथं राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेनं (एनआयए) छापे टाकून अतिरेक्यांना अटक केलीय. एनआयएच्या छाप्यात नऊ अल कायदाच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. सध्या एनआयएकडून याबद्दल विस्तृत माहितीची प्रतीक्षा केली जात आहे.

असं सांगितलं जात आहे की, एनआयए’नं अल-कायदाच्या काही गुप्त ठिकाणांचा शोध लावलाय. एनआयए’नं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम या ठिकाणांवर छापा टाकला आहे. याशिवाय छापा टाकल्यानंतर एनआयए’नं अल-कायदाच्या ९ कार्यकर्त्यांना देखील अटक केलीय.

असं सांगितलं जात आहे की, कोलकाता येथील एनआयएच्या एका कोर्टात गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर विविध दहशतवादी संघटनांशी संपर्क असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या संशयित सदस्य तानिया परवीनविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं गेलं होतं. ८५० पानांच्या आरोपपत्रात एनआयए’नं म्हटलं आहे की, बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बडूरिया येथील कॉलेजची विद्यार्थिनी परवीन (वय २१) सोशल मीडियावर ७० जिहादी गटांशी संपर्कात होती. एनआयए’नं आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ तिच्या संभाषणाचे अंश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सादर केले आहेत. शुक्रवारी एनआयएचे वकील श्यामल घोष म्हणाले की, न्यायालय दोन्ही बाजू ऐकून घेईल आणि त्यांच्यावरील आरोपांचा निर्णय घेईल, त्यानंतर खटला सुरू होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा