मुंबई : मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याच्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
२७ जानेवारीच्या रात्रीपासून हा प्रयोग मुंबईत सुरू होणार आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयानुसार मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकानं २४ तास सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बारसाठी वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.
नाइट लाइफमुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले,’नाइट लाइफ’ हा रोजगाराच्या संधी देण्याचा एक प्रयत्न आहे. या प्रयोगावर टीका करणाऱ्यांनी या संदर्भातील शासन निर्णय वाचावा. कायदा-सुव्यवस्थेबाबत बोलणाऱ्यांनी आधी जेएनयू व दिल्ली सांभाळावी, मग मुंबईबद्दल बाता माराव्यात.मुंबईत गुन्हेगारी वाढणार असल्याच्या आरोपाला उत्तर देताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.