निरागस “स्मिता”

मुंबई : आपल्या निरागस सौंदर्याने सर्वांना आपलेसे करणारी अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज पुण्यतिथी. अवघ्या २० व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या पाटील यांनी आपल्या प्रत्येक भूमिका संवेदनशीलतेने मांडल्या. एक नजर टाकूया त्यांच्या विविध भूमिकांवर…

मराठी भाषेत वृत्तनिवेदक म्हणून काम करणाऱ्या स्मिता पाटील यांची भेट प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याशी झाली. प्रारंभी बेनेगल यांच्या ‘चरण दास चोर’ सिनेमात स्मिता पाटील यांना राजकुमारीची एक छोटी भूमिका मिळाली.
प्रसिद्ध लेखक, नाटककार विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारित ‘निशांत’ चित्रपटापासून खऱ्या अर्थाने स्मिता पाटील यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. निशांत मधील ‘रूक्मिणी’ने भारतीय चित्रपट सृष्टीला स्मिता पाटीलसारखा चेहरा दिला.
‘मंथन’ मधून स्मिता यांनी सहकारी चळवळीत सक्रिय हरिजन स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली. या व्यक्तिरेखीतील सळसळते चैतन्य, आक्रमकता व सचोटी त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे दाखवली.
हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित ‘भूमिका‘ मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणाऱ्या स्त्रीच्या संवेदना अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. या भूमिकेने स्मिता पाटील राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरल्या.
मराठीतील प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या ‘चक्र’ सिनेमातील ‘अम्मा’ च्या भूमिकेबद्दल अभिनयासाठी पाटील यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
केतन मेहता दिग्दर्शित ‘मिर्च मसाला’ मधील सोनबाईची भूमिका अधिक गाजली. मात्र पाटील यांच्या मृत्यूपूर्वी हा शेवटचा सिनेमा ठरला.
‘जैत रे जैत’ चित्रपटामध्ये ‘चिंधी’ या नायिकेच्या भूमिकेत पाटील आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील गाणेदेखील तितकीच अजरामर आहेत.
‘उंबरठा’, ‘जैत रे जैत’ या मराठी सिनेमांत तर त्यांनी त्यांची एक वेळगीच छाप चाहत्यांसमोर ठेवली. यामुळे त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यातही आले. त्यांच्या दर्जेदार अभिनयाने आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे त्या आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत आणि राहतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा