गोल पोस्ट राष्ट्रीय निर्भयाला न्याय देण्यासाठी अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन

निर्भयाला न्याय देण्यासाठी अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन

मुंबई : दिल्ली येथील निर्भया अत्याचार प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे झाली तरी अद्याप शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तातडीने करुन निर्भयाला न्याय मिळावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २० डिसेंबरपासून मौन आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.

पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, महिला अत्याचार व हत्यांच्या घटनांमध्ये आरोपींना शिक्षा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हैदराबाद प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरचे जनतेने स्वागत केले. न्यायालयीन प्रक्रीयेविषयी जनतेमधे संशय निर्माण होणे ही बाब लोकशाहीच्यादृष्टीने घातक आहे. न्यायदान पध्दतीवरचा जनतेचा विश्वास उडाला, तर देशात अराजक माजेल असा इशारा हजारे यांनी पत्रात दिला आहे.
महिलांवरील अत्याचार व हत्या प्रकरणात पश्चिम बंगालमधे १४ वर्षांपूर्वी आरोपीला फाशी देण्यात आली. त्यानंतर चौदा वर्षात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. एकूण ४२६ आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी प्रलंबीत असल्याची बाब हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

दिल्ली येथील निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी व निर्भयाला न्याय द्यावा, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. उपोषणाची तारीख आठ दिवस आधी कळवण्यात येईल, असे हजारे यांनी पत्रात नमूद केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version