पुरंदर दि.१० जून २०२०: पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायत हद्दीत दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार भरविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला खरा. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आठवडे बाजारांमध्ये खरेदीला अनुत्साह दाखवत बाजाराकडे पाठ फिरवली. नेहमीपेक्षा केवळ २० टक्केच लोक आज बाजारात पहावयास मिळाले. एकंदरीतच तीन महिन्यानंतर सुरू झालेल्या या आठवडे बाजाराला लोकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जवळपास वीस हजार लोकांची वस्ती आहे. त्याचबरोबर परिसरात पुरंदर,बारामती, फलटण, खंडाळा या तालुक्यातील लोक आठवडे बाजारात खरेदीला येत असतात.तीन महिने आठवडे बाजार बंद होता. आज आठवडे बाजार सुरू झाल्यानंतर खूप गर्दी होईल असा अंदाज येथील लोकांनी बांधला होता. मात्र नेहमीपेक्षा खूपच कमी गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाचा धोका आजूनही असल्यामुळे लोक घराबाहेर पडायला व गर्दीत मिसळायला धजावत नाहीत. त्यातच निरेजवळ असलेल्या खंडाळा व फलटण तालुक्यातील गावे जिल्हा बंद असल्यामुळे लोक बाजारासाठी येऊ शकले नाही. तसेच लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक व्यापारी व्यापारी गावोगावी जाऊन तरकारी विकत आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांना दररोज ताजी भाजी घरपोच मिळत आहे. त्याचबरोबर आजच्या बाजारात फक्त स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अनेक व्यापारी बाजारत आपली दुकाने लावू शकले नाहीत. त्यामुळे व्यापारी ग्राहकांनी आठवडे बाजारकडे पाठ फिरवल्याचे दिसते.
निरा ग्रामपंचायतीच्यावतीने आठवडी बाजारामध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. बाजार सुरु होण्यापुर्वी बाजारतळाचे. निर्जंतुकीकरण करण्यात आले होते . बाजारामध्ये सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन होईल या बाबत खबरदारी घेतली जात होती. ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय शिंदे, सदस्य,अनिल चव्हाण ,माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, ग्रामसेवक यांनी बाजारात भेट देऊन लोकांना सामाजिक अंतर राखणे व मास्क बांधण्याबाबत सूचना दिल्या. पोलीस प्रशासनाच्या वतीने बाजार तळावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
न्युज अनकट प्रतिनिधी: