नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चेला उधाण

मुंबई, 4 एप्रिल 2022: राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे भाजप मधील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. आता अश्यातच भाजपचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची राहत्या घरी शिवतिर्थावर भेट घेतली आहे. गुढीपाडव्याला महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. या टीकेनंतर अवघ्या काही तासांमध्ये झालेल्या या भेटीमुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी नितीन गडकरी रात्री साधारणत: 10 वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. रात्री जवळपास 12 वाजण्याच्या सुमारास नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानातून बाहेर पडले. यावेळी नितीन गडकरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

नितीन गडकरी यांनी म्हटलं, “माझी ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचं नवं घरंही पहायला त्यांनी मला बोलावलं होतं.”

नितीन गडकरी पुढे म्हणाले, “परवा ह्रदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटलं, एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल. या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा