पाटणा, १६ नोव्हेंबर २०२०: सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता नितीशकुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पाटण्यात एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीशकुमार यांची निवड झाली. केंद्रातून आलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घोषणा केली की नितीशकुमार एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी उपमुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आहेत, तर सुशील कुमार मोदी यांना बाजूला सारण्यात आलं आहे.
राजनाथ यांना भाजपच्या आमदारांच्या बैठकीपर्यंत पोहोचता आलं नाही
सकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची पहिली बैठक झाली. राजनाथ सिंह हेही या बैठकीत सामील होणार होते, पण राजनाथ सिंह पोहोचू शकले नाहीत. राजनाथ सिंह विना भाजपच्या आमदारांची अनौपचारिक बैठक झाली.
जेडीयूच्या बैठकीत नितीश यांची नेता म्हणून निवड
भाजपच्या बैठकीनंतर जेडीयूचे सर्व ४३ आमदार नितीशकुमार यांच्या निवासस्थानी भेटले. या बैठकीत नितीशकुमार यांना जनता दल युनायटेडचे नेते म्हणून निवडलं गेलं.
नितीश यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक
जेडीयूच्या बैठकीनंतर एनडीएचे सर्व १२५ आमदार नितीशकुमार यांच्या निवासस्थानी भेटले. या बैठकीत भाजपाचे ७४, जेडीयूचे, ४३, व्हीआयपीचे ४ आणि हमचे ४ आमदार उपस्थित होते.
तारकिशोर प्रसाद भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते
एनडीएच्या बैठकीपूर्वी येथे भाजपाची बैठक झाली. या बैठकीत कटिहारचे भाजपा आमदार तारकिशोर प्रसाद यांची भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली, तर रेणू देवी यांची उपनेतेपदी निवड झाली. प्रभारी देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव हे देखील भाजपच्या बैठकीस उपस्थित होते.
जेव्हा नितीश यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला…
एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एक काळ असा आला की जेव्हा नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आणि म्हटलं की कोणत्याही भाजपा नेत्यानं हे पद सांभाळावं. बिहारमध्ये जेडीयूनं केवळ ४३ जागा जिंकल्या आहेत, तर एनडीएनं ७४ जागा जिंकल्या आहेत.
एनडीएच्या बैठकीतून बाहेर आल्यानंतर भाजपचे आमदार मंटू कुमार म्हणालं की, नितीशकुमार मुख्यमंत्री होण्यास नकार देत आहेत. त्यांना भाजपमधील कोणी मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची इच्छा होती, पण भाजपाच्या बड्या नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची खात्री पटवून दिली. एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अखेर नितीशकुमार यांची निवड झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे