नाही राहिले ‘हमारा बजाज’ , राहुल बजाज यांचं 83 व्या वर्षी निधन

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2022: बजाज ग्रुपचे मानद अध्यक्ष राहुल बजाज आता आपल्यात नाहीत. 1965 मध्ये बजाज समूहाची सूत्रे हाती घेणारे राहुल बजाज 83 वर्षांचे होते. बजाज यांना न्यूमोनियासह हृदयविकाराचा त्रास होता. गेल्या महिन्यातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल दुपारी 2.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नेहरूंनी ठेवलं ‘राहुल’ नाव

राहुल बजाज यांचा जन्म 1938 मध्ये झाला. त्यांचे आजोबा जमनालाल बजाज हे स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांनी 1926 मध्ये बजाज कंपनी सुरू केली. जमनालाल बजाज यांचा मुलगा कमलनयन बजाज यांनी 1942 मध्ये बजाज ग्रुपचा ताबा घेतला आणि त्यानंतर लवकरच बजाज ऑटो सुरू झाली. राहुल बजाज यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं की, राहुल हे नाव त्यांना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलं होतं. त्यांच्या कुटुंबाचे नेहरूंशी चांगले संबंध होते.

सेंट स्टीफन येथे घेतलं शिक्षण

राहुल बजाज यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून शिक्षणही घेतलं. एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेले. त्यानंतर, 1965 मध्ये परत आल्यावर त्यांनी बजाज ऑटोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि 1968 मध्ये कंपनीचे सीईओ बनले.

‘हमारा बजाज’ ने पोहोचवलं घरोघरी

यापूर्वी बजाज ऑटो हे प्रामुख्याने 3-व्हीलरचे व्यवहार करत होते. आजही ती जगातील सर्वात मोठी थ्री-व्हीलर निर्यात करणारी कंपनी आहे. पण 1972 मध्ये बजाज ऑटोने ‘चेतक’ ब्रँड नावाची स्कूटर भारतीय बाजारात आणली. या स्कूटरने बजाजला देशाच्या कानाकोपऱ्यात ओळख मिळवून दिली.

बजाज चेतकसाठी, कंपनीने मार्केट स्ट्रॅटजी म्हणून ‘हमारा बजाज’ हे स्लोगन तयार केलं आहे. या स्लोगननं अनेक पिढ्या लोकांच्या मनावर राज्य केलं. आजही ही भारतातील सर्वात यशस्वी मार्केटिंग कॅम्पेनपैकी एक मानली जाते.

2005 मध्ये मुलांना नियुक्त केल्या जबाबदाऱ्या

2005 मध्ये, राहुल बजाज यांनी कंपनीत त्यांची मुलं राजीव बजाज आणि संजीव बजाज यांना जबाबदारी दिली. 2008 मध्ये, त्यांनी बजाज ग्रुपचं बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह आणि होल्डिंग कंपनीमध्ये विभाजन केलं. 2021 मध्ये त्यांनी बजाज ऑटोच्या गैर-कार्यकारी अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. मात्र ते कंपनीचे मानद अध्यक्ष राहिले.

राहुल बजाज हे प्रामाणिक आणि स्पष्ट बोलणारे उद्योगपती म्हणून ओळखले जातात. देशातील कोणत्याही विषयावर ते आपलं मत मोकळेपणाने मांडायचे. त्यांनी राजकारणातही योगदान दिलं आणि ते राज्यसभेचे खासदार होते. याशिवाय उद्योगातील योगदानाबद्दल त्यांना 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

त्यांच्या निधनावर राजकारण आणि उद्योग जगतातील विविध लोकांनी शोक व्यक्त केलाय. त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा समावेश आहे.

कोविंद म्हणाले ‘सोडून गेले शून्य’

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या जाण्यानं उद्योगजगतात पोकळी निर्माण झाली आहे, असं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले ‘कुशल वक्ता’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केलाय. त्यांनी राहुल बजाज यांचं योगदान अतुलनीय असल्याचं म्हटलं. तसंच ते संभाषणात अत्यंत कुशल व्यक्ती असल्याचंही सांगितलं.

नितीन गडकरी म्हणाले ‘समाज सेवक उद्योगपती’

राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचं एक यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून वर्णन केलं. त्यांनी लिहिलं की, माझे पद्मभूषण पुरस्कार विजेते राहुलजी यांच्याशी अनेक वर्षांपासून वैयक्तिक संबंध आहेत. गेल्या पाच दशकांपासून बजाज समूहाचे नेतृत्व करणाऱ्या राहुलजींनी उद्योगक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना शक्ती देवो.

राहुल गांधींनी सांगितलं- देशाचं मोठं नुकसान

राहुल बजाज यांचं जाणं हे देशाचं मोठं नुकसान असल्याचं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलंय. तसेच त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा