पुणे, १२ ऑगस्ट २०२३ : १५ ऑगस्ट रोजी देशाच्या ७६व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने होणाऱ्या ध्वजारोहणासाठी राज्यात सरकारकडून पालकमंत्री पदांचे वाटप केले नसल्यामुळे स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनासाठी मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. ती बदलून पुन्हा दुसरी यादी जाहीर केली. त्यावरुन सध्या राज्यात जोरदार वाद रंगला आहे. अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नसल्याने तेथील जबाबदारी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्यांकडे दिली आहे.
पुण्यावरून याचा पेच निर्माण झाला होता. आधी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पुण्याची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यातही आता बदल करण्यात आला असून पुण्यातील ध्वजारोहण हे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील दोन दादांमध्ये राजकारण पेटल्याची तर दोन्ही नेते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
त्यावरून आज अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पवार म्हणाले, अनेक वर्षापासून स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टचे झेंडा वंदन राज्यपालच करतात. तर १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री करतात, असे अजित पवार म्हणाले. तर याच्याआधी मी, गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांनीही ध्वजारोहण केले आहे. पण आता नाराजीच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. फक्त क्षुल्लक कारणाचा बाऊ केला जातोय. कुणाचा रुसवा, फुगवा? कुणी तुम्हाला सांगितले. कुणी रूसून, फुगून सांगितले. चुकीच्या बातम्या देऊ नका, असेही अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर