गोल पोस्ट इतर पर्यावरण उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रातही पारा घसरला

उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रातही पारा घसरला

पुणे, २६ डिसेंबर २०२२ : देशात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका, तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. देशाची राजधानी दिल्लीतही थंडीत वाढ झाल्याने हुडहुडी वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंडीचा जोर कायम राहणार आहे; तसेच धुके पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, रविवारी (ता. २५) सकाळी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये अनेक ठिकाणी दाट धुके पडल्याचे पाहायला मिळाले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस विविध भागांत दाट धुके राहण्याची शक्यता आहे. वायव्य मैदानी भागात कमी उष्णकटिबंधीय पातळीमध्ये जास्त आर्द्रता असणार आहे. त्याचा परिणाम हवामानावर दिसून येणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस पंजाब हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही पारा घसरला
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळे हुहहुडी वाढली आहे. मुंबईतही थंडी वाढली आहे. याचबरोबर मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version