उत्तर कोरिया, 30 सप्टेंबर 2021: उत्तर कोरियाने जगंग प्रांतात नव्याने विकसित केलेल्या हवासॉंग -8 हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. असा अंदाज लावला जात आहे की ही मिसाइल अनुअस्त्र क्षमतेने सुसज्ज आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण विज्ञान अकादमीनं नुकतंच विकसित केलं आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितलं की, उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनाऱ्यावरून समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्रं डागली.
उत्तर कोरियाच्या राज्य माध्यमांनी या क्षेपणास्त्राचं धोरणात्मक शस्त्र म्हणून वर्णन केलंय. क्षेपणास्त्राची चाचणी झाली तेव्हा उत्तर कोरियाचे सर्वात मोठे नेते किम जोंग उन तेथे उपस्थित नव्हते. असं सांगितलं जात आहे की या क्षेपणास्त्राचा समावेश पंचवार्षिक सैन्य योजनेच्या नवीन शस्त्र प्रणाली अंतर्गत बनवलेल्या 5 सर्वात विशेष शस्त्रांमध्ये आहे.
या महिन्यात तिसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी
निर्बंध असूनही उत्तर कोरिया सातत्यानं आपल्या शस्त्रांचं आधुनिकीकरण आणि विस्तार करत आहे. त्याने या महिन्यात तिसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे. उत्तर कोरियाने सामरिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि ट्रेनमधून दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे.
मंगळवारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली
मंगळवारीही उत्तर कोरियाने समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. चाचणीनंतर थोड्याच वेळात, उत्तर कोरियाच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांना सांगितलं की अमेरिकेची उत्तर कोरियाबद्दल प्रतिकूल वृत्ती आहे आणि त्याविरोधात शत्रू धोरणे लागू केली आहेत. यामुळं उत्तर कोरियाला चाचण्या घेण्याचा अधिकार आहे.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाने दुटप्पी वृत्ती अवलंबल्याचा आरोप
उत्तर कोरिया ज्याप्रकारे आपला अण्वस्त्र कार्यक्रम विकसित करत आहे, ते पाहता अमेरिकेने उत्तर कोरियावर अशा चाचण्यांवर बंदी घातली आहे. यासंदर्भात, या हुकूमशाही देशाने अमेरिका आणि दक्षिण कोरियावर शस्त्रास्त्र कार्यक्रमांबाबत दुटप्पी वृत्ती अवलंबल्याचा आरोप केला आहे.
अमेरिका उत्तर कोरियाशी बोलण्यास तयार आहे
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जानेवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर उत्तर कोरियाच्या धोरणांचा आढावा घेतला. वॉशिंग्टनने म्हटले आहे की, उत्तर कोरियाशी कधीही, कुठेही चर्चा करण्यास तयार आहे, पण मोठा करार करणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे