नवी दिल्ली, 4 ऑक्टोंबर 2021: रेल्वेची कामं सातत्यानं चालू असतात. मेन्टेनन्स आणि दुरुस्ती तसेच खराब झालेले निकामी पार्ट यांच्यामुळं रेल्वे विभागाकडं मोठ्या प्रमाणावर भंगार साठलेलं असतं. रेल्वे रुळांच्या बाजूला आणि रेल्वे परिसरात पडलेले हे भंगार विकून रेल्वे महसूल मिळवत आहे. या प्रकरणी उत्तर रेल्वे इतर प्रादेशिक रेल्वेच्या पुढं आहे. या आर्थिक वर्षात आतापर्यंत उत्तर रेल्वेने भंगार विकून 227.71 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय, जो आजपर्यंतचा विक्रम आहे. भंगार विक्रीच्या बाबतीत उत्तर रेल्वे आता भारतीय रेल्वे आणि पीएसयूमध्ये अव्वल स्थानावर आली आहे.
रेल्वे ट्रॅकचे तुकडे, स्लीपर, रेल्वे लाईनजवळ टायर सारख्या स्क्रॅपमुळं सुरक्षिततेशी संबंधित धोका असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाण्याच्या टाक्या, केबिन, क्वार्टरचा गैरवापर होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच रेल्वे स्क्रॅप चे भंगार विकून पैसे कमवते. उत्तर रेल्वे मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या स्क्रॅप पीएससी स्लीपरची विल्हेवाट लावत आहे, जेणेकरून रेल्वेची जमीन इतर कामांसाठी आणि महसूल उत्पन्नासाठी वापरता येईल.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 146% अधिक महसूल
उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक आशुतोष गांगल म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत भंगार विकून 146 टक्के अधिक महसूल प्राप्त झालाय. गेल्या वर्षी या कालावधीत केवळ 92.49 कोटी रुपये मिळाले होते तर या वर्षी ते वाढून 227.71 कोटी रुपये झाले आहे. जे इतर झोनल रेल्वेपेक्षा जास्त आहे.
यावर्षी भंगार विक्रीचं लक्ष्य
रेल्वे बोर्डाने यावर्षी उत्तर रेल्वेला 370 कोटी रुपयांच्या भंगार विक्रीचं लक्ष्य दिलं आहे. वास्तविक, रेल्वे रुळाजवळ रेल्वे ट्रॅकचे तुकडे झाल्यानं अपघात होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन भंगार काढण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. उत्तर रेल्वे शून्य भंगार दर्जा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे