सिमला नव्हे, हे तर साक्री तालुक्यातील मळखेडा, खोरी, टिटाणे; गारपिटीच्या तडाख्याने सर्वत्र पिके भुईसपाट!

पुणे, ७ मार्च २०२३ : धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. मळखेडा, खोरी, टिटाणे (ता. साक्री, जि. धुळे) भागात ही गारपीट झाली आहे. आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारपासून साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी गारपिटीसह वादळी वारा व मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास एक ते दीड तास चाललेल्या या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यामध्ये गहू, हरभरा, त्याचबरोबर कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,

सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना दुपारनंतर अचानकपणे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतशिवारांत, तसेच रस्त्यांवर सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, साक्री तालुक्यात सिमला, कुलू-मनालीसारखे वातावरण झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातात तोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, धुळ्यात तत्काळ पंचनामे करण्यात येणार आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा