पुणे दि.२२ मे २०२०: पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉल येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, तसेच कोरोना प्रतिबंधासाठी नियुक्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तथा साखर आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भुजल सर्वेक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, समन्वय अधिकारी राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर व चोक्कलिंगम यांनी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये असणारी शासकीय व खाजगी रुग्णालये, यामधील उपलब्ध खाटांची संख्या, अतिदक्षता विभागात उपलब्ध खाटा व अन्य बाबींचा आढावा घेतला.
यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती तयारी करावी. प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण वाढू नयेत, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. कोविड रुग्णांवर उपचार करताना अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये, या दृष्टीने काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक व उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांची यादी करुन त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याचबरोबर कोविडचा संसर्ग वाढू नये, यासाठी सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर, स्वछतेबाबत जनजागृती करावी. शासकीय व खासगी रुग्णालयांतील उपलब्ध बेडची संख्या विचारात घेऊन पुढील काळात गरज भासल्यास आवश्यक बेड, व्हेंटिलेटर व त्या अनुषंगिक वैद्यकीय साधनसामग्रीची व्यवस्था करुन घ्यावी. खासगी रुग्णालयांनी गोर-गरीब रुग्णांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी. तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रयोगशाळांनी स्वॅब तपासणीची क्षमता वाढवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
न्युज अनकट प्रतिनिधी: