सोलापूर, दि.१९ मे २०२०: कोरोना आपत्तीच्या काळात आरोग्य सेवा बंद ठेवल्याचे सांगत शहरातील २८ रुग्णालयांच्या प्रमुखांना महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
रुग्णालय तात्काळ सुरू न केल्यास ते सील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. परंतु, अनेक रुग्णालयांच्या डॉक्टरांनी या नोटिसीला हरकत घेतली आहे. आरोग्य विभागाने प्रत्यक्ष माहिती न घेता ऐकीव माहितीवर ही नोटीस बजावल्याचा आरोप केला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील नर्सिंग होम, हॉस्पिटल यांना ओपीडी व आयपीडीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार सुविधा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अनेक रुग्णालये बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. रुग्ण थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. सरकारी यंत्रणेवर ताण येत आहे.
आपत्तीच्या काळात आपली रुग्णालये बंद ठेवणा-या डॉक्टरांवर कारवाई करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. लोकांनी काही रुग्णालयांबाबत तक्रारी केल्या. यात २८ नर्सिंग होम, रुग्णालये बंद असल्याचे आढळून आले.
यासंदर्भात २ दिवसांत खुलासा सादर करावा. खुलासा सादर न केल्यास रुग्णालय, नर्सिंग होम सील करण्यात येणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: