श्रीनगर, २८ नोव्हेंबर २०२२ : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना आणि सात माजी आमदारांना अनंतनाग जिल्हा प्रशासनकडून रविवारी २४ तासांच्या आत सरकारी निवासस्थाने सोडण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच दिलेल्या कालावधीत घर खाली न केल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
मेहबूबा मुफ्ती यांना गेल्या महिन्यातही श्रीनगरमधील गुपकार भागातील त्यांचे निवासस्थान सोडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर रविवारी अनंतनागच्या उपायुक्तांच्या आदेशानुसार प्रथम श्रेणी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी ही नोटीस मुफ्ती यांना देण्यात आली होती.
मेहबूबा मुफ्ती यांच्यासह माजी आमदार मोहम्मद अल्ताफ वनी, अब्दुल रहीम राथेर, अब्दुल मजीद भट, अल्ताफ शाह, अब्दुल कबीर पठाण, माजी आमदार बशीर शाह आणि चौधरी निजामुद्दीन यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.