दामाजी साखर कारखान्याच्या सभासदांना नोटिसांमुळे धक्का

सोलापूर, दि.२५ मे २०२०: सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा येथील श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी कारखान्याच्या सुधारित पोटनियमांची पूर्तता न केल्यामुळे त्यांना अक्रियाशील सभासदत्व, अशी वर्गवारी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सभासदांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये जवळपास ७० टक्क्यांपेक्षा अधिक सभासद असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अवघ्या ८ महिन्यावर येऊन ठेपली असताना मतदानाच्या अधिकाराबाबत सभासदांना बजावलेल्या नोटीसा महत्त्वपूर्ण आहे. कारखान्याना १५ एप्रिल रोजी दिलेल्या या नोटीसा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० कलम २६(२)नुसार बजावण्यात आल्या आहेत.

कारखान्याच्या ५ वर्षाच्या गळीत हंगामपैकी किमान एका हंगामात सभासदांनी संस्थेला ऊस पुरवठा केला पाहिजे व मागील ५ वर्षात सरासरी किमान एका सर्वसाधारण सभेस हजर असणे बंधनकारक आहे. कलम २७ (१०) मधील तरतुदीनुसार कारखान्याचे लेखापरीक्षण झाले आहे.

यामध्ये अनेक सभासद क्रियाशील नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित सभासदांना कळविण्याच्या दृष्टीने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे कारखान्याच्या १९ हजार सभासदात खळबळ उडाली. याबाबत नोटिसानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष नंदकुमार पवार, सभासद राहुल घुले, शशिकांत चव्हाण, तुकाराम कुदळे, संतोष मोगले या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे तक्रार केली असून सभासदांना कायम क्रियाशील ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा