मुंबई, १९ ऑगस्ट २०२०: डॉक्टर आणि कंपाउंडर या विधानावरून संजय राऊत चांगलेच माध्यमांच्या व जनतेच्या निशाण्यावर आले होते. विधान करून चर्चेत राहणं हे संजय राऊतांच्या बाबतीत नेहमीच घडत असतं. आता सुशांत प्रकरणावर देखील त्यांचे विधान आलं आहे. आज सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणावर आपला प्रलंबित निर्णय सुनावला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, पुढील प्रकरणाची चौकशी ही सीबीआय’कडे असेल तसेच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेली चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत. यावर संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
सुशांत प्रकरणाची चौकशी ही मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे गेल्याने मुंबई पोलिसांवर हा एका प्रकारे अत्याचार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे केल्याचं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
संजय राऊत म्हणाले की, ‘सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा जो निर्णय दिला आहे. त्यावर महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता, पोलीस आयुक्त बोलू शकतील. पण महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. राज्याची एक मोठी परंपरा आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारं हे राज्य आहे. या राज्याने आतापर्यंत कोणाचाही अपमान केलेला नाही’.
मुंबई पोलिसांनी केलेल्या याप्रकरणाच्या तपासा विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र आहे. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे तपास केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात, देशभरात आहे. जर मुंबई पोलिसांना आपल्याच राज्यातील राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचं खच्चीकरण करत आहेत.’ अशी टिकाही संजय राऊत यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी