आता चीननं दाखविलं प्रेषित मोहम्मद यांचं व्यंगचित्र, पाकिस्ताननं पाळलं मौन

चीन, ४ नोव्हेंबर २०२०: फ्रान्समध्ये पाकिस्तानने प्रेषित मोहम्मद यांच्या व्यंगचित्रांना कडाडून विरोध दर्शविला होता आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनवर इस्लामोफोबियाचा प्रचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, जेव्हा मित्र चीननं सरकारी टेलिव्हिजनवर पैगंबर हजरत मोहम्मद यांचं चित्र दाखविलं तेव्हा पाकिस्ताननं मौन पाळलं आहे.

वस्तुतः चीनचे सरकारी चॅनेल चायना सेंट्रल टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) ने नुकतीच प्रेषित मोहम्मद यांच्या व्यंगचित्रांचं प्रसारण केलं. टीव्ही मालिकेची ही क्लिप विगर कार्यकर्ते अर्शलन हिदायत यांनी ट्विट केली आहे. या क्लिपमध्ये एक अरब राजदूताला तांग राजवंश दरबारात दाखवले आहे. त्यामध्ये अरब राजदूत चिनी सम्राटाकडे पैगंबर मोहम्मद यांचं एक चित्र देताना दिसत आहेत.

तथापि, चीनच्या या कारवाईविरोधात पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. पाकिस्ताननं यापूर्वीदेखील चीनमधील विगर मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल व दडपशाही बद्दल मौन बाळगलं होतं.

चीनमध्ये टीव्हीवर प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. सोशल मीडियावर बर्‍याच वापरकर्त्यांनी असा सवाल केला की टीव्ही कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांची चित्रं दाखवणं निंदनीय नाही का? जेव्हा पैगंबर मोहम्मद यांचं व्यंगचित्र दाखविलं जातं तेव्हा मुस्लिम जग चिनी वस्तूंच्या बहिष्कारासाठी आवाहन करणार नाही का असा सवालही एका वापरकर्त्यानं केला.

तथापि, चीनच्या विगर मुस्लिमांविषयी पाकिस्तानची दुटप्पी वृत्ती यापूर्वीही दिसून आली आहे. काश्मिर ते पॅलेस्टाईनच्या मुद्यावर पाकिस्ताननं जोरजोरात आवाज उठविला आहे, परंतु विगर मुस्लिमांचा प्रश्न येताच पाकिस्तान मौन बाळगतो. पाकिस्तानमधील पंतप्रधान इम्रान खान यांना चीनमधील विगर मुस्लिमांच्या दयनीय अवस्थेबद्दल अनेकदा प्रश्न विचारण्यात आले पण त्यांनी या प्रश्नांबाबत पाठ फिरवली. काही मुलाखतींमध्ये इम्रान खान देखील चीनला पाठिंबा देताना दिसले आणि म्हणाले की दहशतवादाविरूद्ध लढण्याचा प्रत्येक देशाचा अधिकार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा