मथुरा, ४ नोव्हेंबर २०२०: उत्तर प्रदेशातील मथुराच्या गोवर्धन भागातील ईदगाहमध्ये हनुमान चालीसा वाचल्याचा प्रकार समोर आला आहे. शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. नुकतेच नांदगाव येथील नंदबाबा मंदिरात दोन मुस्लिम तरुणांनी नमाज पठण केल्याची घटना उघडकीस आली, त्यानंतर प्रशासनाने दोन्ही तरुणांना अटक करून तुरूंगात पाठविलं. ही बाब अद्याप शांत झाली नव्हती की, आता गोवर्धनमधील चार तरुणांनी बरसाना रोडवरील ईदगाहमध्ये हनुमान चालीसा वाचल्याची बाब समोर आलीय.
गोवर्धन येथील रहिवासी असलेल्या सौरभ लंबरदार, राघव मित्तल, कान्हा ठाकूर आणि कृष्णा ठाकूर हे चार तरुण मस्जिदच्या आवारामध्ये पोहचले आणि हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात केली, यासह त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस प्रशासनानं यावर कारवाई करत चारीही युवकांना अटक केली.
एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर म्हणाले की, मथुरा हिंदू-मुस्लिम सौहार्दाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि अशा परिस्थितीत कोणत्याही समाजातील कोणत्याही व्यक्तीला शांतता भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशी कामं करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
त्याचवेळी मथुराचे डीएम सर्वज्ञ राम मिश्रा म्हणाले की, कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही. कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही प्रकारची विकृती पसरविण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.
मंदिरात नमाज पठण केल्याबद्दल अटक
यापूर्वी मंदिरामध्ये दोन युवकांनी नमाज पठण केला होता. नमाज पठण करणाऱ्या फैसल खानला उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्लीतील जामिया नगरमधून अटक केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा आरोप आहे की २९ ऑक्टोबरला चार जण मथुराच्या नंदाबाबा मंदिरात गेले होते. यापैकी दोन जणांनी मंदिर परिसरात प्रार्थना केली. या प्रकरणात कलम १५३ ए, २९५, ५०५ अन्वये बरसाना पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे