Team India Asia Cup, ७ सप्टेंबर २०२२: आशिया कप २०२२ च्या सुपर फोर टप्प्यात भारतीय संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. भारताने श्रीलंकेला १७४ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले.
पाकिस्तान आणि आता श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणे कठीण झाले आहे. आता या स्पर्धेत टिकण्यासाठी टीम इंडियाला पूर्णपणे इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. विशेषत: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर सर्व काही अवलंबून असेल. आज (७ सप्टेंबर) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना आहे. पाकिस्तानने येथे विजय मिळवल्यास भारत स्पर्धेबाहेर होईल आणि त्यानंतर त्यांचा शेवटचा सामना ही केवळ औपचारिकता राहील.
अशा स्थितीत भारताला अंतिम फेरीत पोहोचण्याची केवळ ही संधी
• अफगाणिस्तानने त्यांच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करावा.
• त्यानंतर भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करावा.
• दुसरीकडे श्रीलंकेनेही पाकिस्तानला हरवायला हवे.
• भारताचा नेट रन रेट अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपेक्षा चांगला असावा.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर भारतीय संघाची थोडी आशा आहे. अफगाणिस्तानसाठी पाकिस्तानला हरवणे म्हणजे एव्हरेस्टवर चढाई करण्यासारखे आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध दोन टी-२० आणि चार एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. म्हणजेच अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला तर तो इतिहास घडवेल. यासोबतच भारतीय संघाच्या आशाही कायम राहतील.
भारताचा नेट रनही खूपच खराब
आशिया कप २०२२ च्या सुपर-फोर टेबलमध्ये, श्रीलंका दोन सामन्यांतून चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ दोन गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही देशांचा नेट रनरेट + मध्ये आहे. भारत आणि अफगाणिस्तान अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. भारताच्या निव्वळ रन रेटबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या -०.१२५ आहे.
पाकिस्तान जिंकताच भारत बाहेर
जर पाकिस्तानचा संघ आज जिंकला तर अफगाणिस्तान आणि भारत हे दोन्ही संघ आशिया कपमधून बाहेर होतील. अशा स्थितीत ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. तसे, श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर एक गोष्ट निश्चित आहे की, आता ११ सप्टेंबरला भारत-पाकिस्तानचा अंतिम सामना होणार नाही.
रोहित शर्माने केली शानदार खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी लवकरच त्यांचे दोन विकेट गमावल्या. यानंतर रोहितने सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करत भारतीय डावाचा ताबा घेतला. रोहित शर्माने ४१ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह ७२ धावा केल्या. सूर्याने २९ चेंडूत ३४ धावांची खेळीही खेळली. या दोघांच्या शानदार खेळीमुळे भारताला २० षटकांत आठ गडी गमावून १७३ धावा करता आल्या.
शनाका-राजपक्षे यांनी खेचला सामना
प्रत्युत्तरात पथुम निसांका (५२ धावा) आणि कुसल मेंडिस (५७ धावा) यांनी श्रीलंकेला ९७ धावांची भागीदारी करून शानदार सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने वारंवार अंतराने विकेट गमावल्याने त्यांची धावसंख्या चार बाद ११० अशी झाली. अशा स्थितीत भारत हा सामना जिंकू शकेल असे वाटत होते, पण दासून शनाका आणि राजपक्षे यांच्या शानदार फलंदाजीने भारताकडून सामना हिरावून घेतला. दासुन शनाका ३३ आणि भानुका राजपक्षे २५ धावांवर नाबाद राहिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे