सिंधुदुर्ग: महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे, तर ३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहून सर्वांनी त्याचा धसका घेतला आहे आणि त्यातच आता या महाभयंकर कोरोनासह आणखी एक संकट येऊन ठेपलंय, ते म्हणजे माकडताप. कोकणातील सिंधुदुर्गमध्ये माकडतापाचे संकट आलं आहे. येथील बांदा दशक्रोशीत माकडतापाने या हंगामात दुसरा बळी घेतला आहे.
मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिनेश शांताराम देसाई (४५, रा. डेगवे – मोयझरवाडी) यांचा माकडतापाने मृत्यू झाला. गेले दीड महिने त्यांच्यावर बांबोळी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती उपचारांना हवी तशी साथ देत नव्हती. माकडतापाचा या हंगामात दुसरा बळी गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या ३ महिन्यांत १८ रुग्ण आढळलेत.
जिल्ह्यातील डेगवे आणि पडवे गावात माकडतापामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या दोघांवरही गोवा बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान एका रुग्णा चार दिवसांपूर्वी तर एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनासह आता नागरिकांमध्ये माकडतापाबाबतही भीती निर्माण झाली आहे. या आजाराने दोघांचा बळी घेतल्यानंतर दोडामार्ग तालुक्यातल्या 8 गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.