आता फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींचा थरार रंगणार

दोहा, ९ डिसेंबर २०२२ : फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींचा थरार आता रंगणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या आठ देशांपैकी पाच देश हे युरोप खंडातील आहेत. यामध्ये क्रोएशिया, नेदरलँड, पोर्तुगाल, इंग्लंड व फ्रान्स या बलाढ्य देशांचा समावेश आहे. दरम्यान, ब्राझील व अर्जेंटिना हे दोन देश दक्षिण अमेरिकेतील आहेत. तर मोरोक्को हा आफ्रिका खंडातील एकमेव देश असून, मोरोक्कोचे यश वाखाणण्याजोगे आहे.

विश्वकरंडकावर युरोपचीच मक्तेदारी
२००२ मध्ये ब्राझीलने विश्वकरंडक जिंकला होता; पण त्यानंतर २००६ मध्ये इटली, २०१० मध्ये स्पेन, २०१४ मध्ये जर्मनी व २०१८ मध्ये फ्रान्सने विश्वकरंडकाच्या जेतेपदावर मोहर उमटविली होती. यंदाही युरोप खंडातील पाच देश उपांत्यपूर्व फेरीत पोचले आहेत. त्यामुळे सलग पाचव्यांदा युरोप खंडातील देशांकडेच फिफा वर्ल्डकप अधिक वेळ आहे.

ब्राझील, अर्जेंटिनाही दावेदार
दक्षिण अमेरिकन खंडातील देशांनी विश्वकरंडक जिंकून २० वर्षे उलटून गेली. ब्राझीलने २००२ मध्ये; तर अर्जेंटिनाने १९८६ मध्ये जागतिक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले होते. हे दोन्ही देश जेतेपदावर हक्क सांगण्यासाठी आतुर झाले आहेत. तरी आगामी दिवसांमध्ये हे दोन्ही संघ कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मोरोक्कोचा संघ इतिहास रचणार?
मोरोक्को हा आफ्रिकन खंडातील देश. आफ्रिकन खंडामधून कॅमेरून, सेनेगल व घाना या तीन देशांनंतर मोरोक्कोने फिफा विश्वकरंडकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे; मात्र कॅमेरून, सेनेगल व घाना यांच्यापैकी एकाही देशाला पुढे जाऊन उपांत्य किंवा अंतिम फेरी गाठता आलेली नाही. मोरोक्कोचा संघ इतिहास रचतो का, याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा