आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा येणार दूरदर्शनवर कार्यक्रम

मुंबई, २८ सप्टेंबर २०२०: याआधी महाराष्ट्र ज्ञान महामंडळानं विद्या प्राधिकरणाच्या सहकार्यानं पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ हा कार्यक्रम सुरु केला होता. मात्र नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र याला पर्याय म्हणून १५ जून पासून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलं होतं. दरम्यान विद्यार्थ्यांना घरात बसून शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत होता. त्यासाठी मे-जून महिन्यापासून राज्याच्या शिक्षण विभागाकडून दूरदर्शनकडे वेळ मागण्यात आली होती. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना याबाबत पत्र लिहून दूरदर्शनकडून वेळ मिळावी अशी विनंती केली होती.

त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे, अशी माहिती विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शन वर कार्यक्रम केंव्हा व कसे प्रसारित होणार याबाबतचे वेळापत्रक देखील लवकरच दिले जाईल असं त्यांनी सांगितलं.

याआधी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर कोणताही कार्यक्रम प्रसारित केला जात नव्हता मात्र आता लवकरच हा कार्यक्रम सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. दरम्यान, केंद्रानं इयत्ता नववी ते बारावी शाळा २१ सप्टेंबरला सुरु करण्याबाबत गाईडलाइन्स जाहीर केल्या असताना २१ सप्टेंबरपासून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्यानंतर शाळा सुरु होईपर्यंत या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा