अग्रलेख
पुन्हा अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्यावर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन दाव्याने जगाला धक्का बसला आहे. ट्रम्प म्हणतात, की पाकिस्तान अण्वस्त्रांची चाचणी करत आहे. रशिया, चीन आणि पाकिस्तानवर ट्रम्प यांचा आरोप आहे. ज्या ट्रम्प यांनी दहशतवादी पाकिस्तानला ट्रम्प यंच्या व्यावसायिक फायद्यासाठी मदत केली, त्या ट्रम्प याच्यावर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्न असला, तरी त्यांचे सर्वंच म्हणणे खोटे ठरविता येणार नाही. रशियाने घातक अण्वस्त्रांची चाचणी घेतल्यानंतर ट्रम्प यांचे हे वक्तव्य आल्यामुळे भारतालाही आता त्याचा विचार करावा लागेल. तीन दशकानंतर जगात पुन्हा अण्वस्त्र स्पर्धा सुरू झाली आहे आणि तसे होत असेल, तर जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे, हे स्पष्ट आहे.
अमेरिका आणि रशिया यांच्यातील अण्वस्त्र स्पर्धा तीन दशकांपूर्वी मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या काळात थांबली होती. अमेरिका आणि रशियाने शांतता करार केला. त्यानंतर आता अमेरिका आणि रशियाच्या नेतृत्वांनी त्यांच्या राष्ट्रांना पुन्हा गतवैभव प्राप्त करण्याच्या भाषेतून त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. रशियाने नुकतीच घातक अण्वस्त्राची चाचणी घेतल्यानंतर तर ही स्पर्धा वाढायला लागली आहे. त्यातून ट्रम्प यांनी जगालाच धमकी दिली आहे. जग नष्ट करू शकतो, अशी उद्दामपणाची भाषा वापरली आहे. ट्रम्प यांचा रोख चीन. पाकिस्तान आणि रशियाकडे असला, तरी त्यामुळे भारतालाही धोका आहे आणि भारताला त्याचा विचार करावा लागेल. ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अन्य देशांच्या जमिनी ताब्यात घेण्याची वापरलेली भाषा ही युद्धखोराची आहे. रशिया, चीन आणि पाकिस्तानला इशारा देताना अमेरिकेलाच अण्वस्त्र चाचण्या करण्याची खुमखुमी आली आहे आणि त्यासाठी ते जगाची मानसिकता तयार करीत आहेत, असा त्याचा अर्थ आहे.
अमेरिकेकडे १५० वेळा जग नष्ट करण्यासाठी पुरेशी अण्वस्त्रे आहेत, अशी गर्भित धमकी देताना रशिया आणि चीनमुळे आम्हालाही अण्वस्त्र स्पर्धेत उतरावे लागेल, असे त्यांना म्हणायचे आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या चाचणीबद्दल ट्रम्प यांचा दावा संपूर्ण दक्षिण आशियाला इशारा आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांकडेही अण्वस्त्रे आहेत आणि जेव्हा तणाव वाढतो तेव्हा जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर केंद्रित होते. तथापि, अण्वस्त्रांबाबत भारत आणि पाकिस्तानची धोरणे वेगवेगळी आहेत. पाकिस्तानचे धोरण असे आहे, की जर त्याला वाटत असेल की त्याच्या सुरक्षेला धोका आहे, तर तो प्रथम अण्वस्त्रे वापरू शकतो. याला ‘नो फर्स्ट यूज पॉलिसी’ म्हणतात. तथापि, भारताचे धोरण असे आहे, की तो प्रथम अण्वस्त्रे वापरणार नाही.f ट्रम्प यांचा दावा भारतासाठी एक संधी असू शकतो.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले, तेव्हा पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चार दिवसांत शरणागती पत्करली. भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. अकरा हवाई तळही उडवून दिले. भारताबरोबरच्या युद्धात पराभूत झालेला पाकिस्तान थेट अमेरिकेच्या कुशीत पहुडला. ट्रम्प यांनी याच पाकिस्तानला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली. फील्ड मार्शल असीम मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ दोघेही ट्रम्प यांचे बूट चाटत होते आणि ट्रम्प यांनी त्यात धन्यता मानली होती.
ट्रम्प यांनी पाकिस्तानबद्दल एक मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की उत्तर कोरिया, रशिया, चीन आणि पाकिस्तान अण्वस्त्रांची चाचणी करत आहेत. अशा परिस्थितीत भारताची संरक्षण व्यवस्था त्यांना तोंड देऊ शकेल का? भारताचे दोन्ही शेजारी, चीन आणि पाकिस्तान अण्वस्त्रांची चाचणी करत असतील, तर परिस्थिती अत्यंत गंभीर होते. कारण जर आपले शेजारी मोठी योजना आखत असतील आणि भविष्यात जर दोन आघाड्यांवर युद्ध झाले, तर त्याचा प्रभावीपणे प्रतिकार करता येईल, यासाठी भारताने पूर्णपणे तयार राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्र चाचणीला उत्तर म्हणून भारत थेट हायड्रोजन बॉम्बची चाचणी करू शकतो. पाकिस्तानलाही याची भीती वाटते. हायड्रोजन बॉम्ब हा अण्वस्त्रांपेक्षा खूपच घातक आणि विध्वंसक असतो. या संदर्भात, पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी इशारा दिला आहे, की भारत लवकरच नवीन थर्मोन्यूक्लियर बॉम्बची चाचणी करू शकतो. १९९८ मध्ये भारताने पोखरणमध्ये पाच अणुचाचण्या केल्या, त्यापैकी एक थर्मोन्यूक्लियर असल्याचे वृत्त होते. त्यानंतर सतरा दिवसांनी पाकिस्ताननेही सहा चाचण्या केल्या. त्या वेळी दोन्ही देशांमध्ये अणुसंतुलन प्रस्थापित झाले. तथापि, जर भारताने दुसरी चाचणी केली, तर हे संतुलन पुन्हा बिघडू शकते.
ट्रम्प यंच्या दाव्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. अमेरिकेने स्वतः अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत, ते भारतासाठी एक निमित्त ठरू शकते. जर अमेरिकेने उघडपणे चाचण्या केल्या, तर भारतही स्वतःच्या सुरक्षेच्या हितासाठी असे करत असल्याचा दावा करू शकतो. आता भीतीपोटी, पाकिस्तानचे लोक ट्रम्प यांना शिव्याशाप देत आहेत. १९९८ पासून भारताने एकही अण्वस्त्र चाचणी केलेली नाही. ताज्या अहवालांनुसार, भारताकडे १८० अण्वस्त्रे आहेत, तर चीनकडे ६०० अण्वस्त्र आहेत. २०३० पर्यंत ही संख्या एक हजारांपर्यंत वाढू शकते. पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे आहेत. ट्रम्प यांनी रशिया, चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरियाचे नाव घेतले. या देशांकडे मिळून एकूण ६,२७९ अण्वस्त्रे आहेत. आपण सर्व नऊ अण्वस्त्र शक्तींकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या पाहिली, तर ही आकडेवारी धक्कादायक आहे. रशियाकडे सर्वाधिक ५,४५९ अण्वस्त्रे आहेत. अमेरिका ५,१७७ अण्वस्त्रांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीन ६०० अण्वस्त्रांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर फ्रान्सकडे २९० अण्वस्त्र आहेत. ब्रिटनकडे २२५ इस्रायलकडे ९० आणि उत्तर कोरियाकडे ५० अण्वस्त्रे आहेत.
‘अमेरिकन थिंक टँक फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स’च्या मते पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम १९७२ मध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांनी सुरू केला. १९७४ मध्ये भारताच्या पहिल्या अणुचाचणीनंतर भुट्टो यांनी लगेचच पत्रकार परिषदेत सांगितले, की भारतीय उपखंड आता सुरक्षित नाही आणि पाकिस्तानला अणुशक्ती बनावे लागेल. १९८५ मध्ये पाकिस्तानने शस्त्रास्त्र-ग्रेड युरेनियम उत्पादनाची मर्यादा ओलांडली होती. तथापि, २८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने अधिकृतपणे घोषणा केली, की त्यांनी पाच यशस्वी अणुचाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांमुळे रिश्टर स्केलवर ५.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आणि एकूण स्फोटक उत्पादन अंदाजे ४० किलोटन टीएनटी समतुल्य असल्याचा अंदाज होता. अमेरिका, रशिया आणि चीनने त्यांच्या चाचण्या पुन्हा सुरू केल्या, तर भारताला त्यांच्या हायड्रोजन बॉम्बची पुन्हा चाचणी करण्याची आणि नवीन, अधिक शक्तिशाली आणि लहान क्षेपणास्त्रांसाठी वॉरहेड्सची चाचणी करण्याची संधी आहे. काही महिन्यांपूर्वी नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले आता ट्रम्प अणुबॉम्ब चाचणीची भाषा करीत आहेत. युद्धे थांबवल्याचा दावा करणारे ट्रण्प आता स्वतःच युद्धखोरीला प्रोत्साहन देत आहेत आणि त्यासाठी इतर देशांची उदाहरणे पुढे करीत आहेत.
नोबेल पुरस्काराने हुलकावणी दिल्यानंतर त्यांचा अजेंडा बदलला आहे. काही दिवसांपूर्वी नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या संरक्षण विभागाला अणुबॉम्बची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी युद्ध विभागाला जवळजवळ ३३ वर्षांनंतर अणुचाचण्या करण्याचे अधिकार दिले होते. १९९६ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अणुबॉम्बची शर्यत संपवण्यासाठी अणुचाचण्यांवर बंदी घातली होती; परंतु ट्रम्प यांनी आता अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ज्यामुळे अमेरिकेत गोंधळ उडाला आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला, की रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान गुप्तपणे अणुबॉम्बची चाचणी करत आहेत. म्हणूनच, अमेरिकेने स्वतःचे अणुबॉम्बची चाचणी करणे आवश्यक झाले आहे.
ट्रम्प म्हणतात, की या देशांना त्यांच्या अणुचाचण्यांसाठी कोणालाही उत्तर देण्याची गरज नाही. म्हणूनच ते संयम न ठेवता अणुचाचण्या करत आहेत. आतापर्यंत ते अशा प्रकारे शांततेचा उपदेश करत होते, की जणू त्यांच्यापेक्षा शांततेचे आदर्श कोणी जन्माला आलेले नाही. तथापि, रशियाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करताच, ट्रम्प यांनी लगेचच अणुचाचणीचे आदेश दिले. ही शांतता चर्चा केवळ ढोंग असल्याचे सिद्ध झाले. ट्रम्प यांनी सातत्याने जागतिक अशांतता संपवण्याचा दावा केला आहे. त्यांनी अनेक युद्धे संपवल्याचा दावादेखील केला आहे; परंतु वास्तव अगदी वेगळे आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध संपवण्याचा त्यांचा दावा खोटा ठरला आहे. काँगो आणि रवांडा यांच्यातील युद्धही संपलेले नाही. इजिप्त आणि इथिओपियामध्ये कोणतेही युद्ध झाले नाही. फक्त पाण्याचा वाद झाला. सर्बिया आणि कोसोवोमध्ये तणाव कायम आहे. कंबोडिया आणि थायलंडमधील सीमा वादात शांतता आली आहे; परंतु युद्ध संपलेले नाही. इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता करार झाला होता; परंतु तरीही इस्रायलने असंख्य हल्ले केले आहेत. गेल्या आठवड्यातच गाझामध्ये शंभराहून अधिक लोक मारले गेले. ट्रम्प इस्रायलची बाजू घेत आहेत आणि जर त्यांनी आज्ञा मोडली तर हमासवर हल्ला करण्याची धमकी देत आहेत. ट्रम्प कोणत्या प्रकारच्या शांततेचे गीत गात आहेत असा प्रश्न सर्वांना पडला आहे?
न्यूज अनकट प्रतिनिधी: भागा वरखडे













































