रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ, २४ तासात ६०८८ नवे रुग्ण

मुंबई, दि. २२ मे २०२०: कोरोना व्हायरसची होणारी वाढ अजूनही कायम चालूच आहे. भारतात देखील आता याचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. दिवसेंदिवस याची संख्या वाढत असताना एका दिवसात विक्रमी संख्यादेखील नोंदवली जात आहे. गेल्या २४ तासात भारतात ६०८८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचली आहे.

दरम्यान १४८ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ३५८३ झाली आहे. आतापर्यंत ४८ हजार ५३३ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ४०.९७ टक्के आहे.

देशातील राज्यवार विचार केल्यास महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात कालही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत २३४५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४१ हजार ६४२ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू मध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. येथे काल दिवसभरात ७७६ नवे रुग्ण आढळल्याने येथील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ हजार ९६७ वर पोहचली आहे. तर गुजरातमध्ये कोरोनाचे १२ हजार ९०५ आणि दिल्लीमध्ये ११ हजार ६५९ रुग्ण झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा