पोषण मूल्य व आरोग्यदायी परसबाग परिसंवाद व पोषण थाळी स्पर्धा

बारामती, १७ सप्टेंबर २०२०: माळेगाव येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती, आय.सी.ए.आर, नवी दिल्ली – नारी प्रकल्पांतर्गत शारदा महिला संघ , पंचायत समिती, बारामती आणि शारदा कृषि वाहिनी ९०.८ यांच्या संयुक्त विद्यमाने दि १७ सप्टेंबर रोजी कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे पोषण माह – २०२० अभियानांतर्गत पोषण मूल्य व आरोग्यदायी परसबाग परिसंवाद व पोषण थाळी स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन सुनंदाताई पवार, विश्वस्त, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी पवार म्हणाल्या स्वाईनफ्लू, डेंगू, चिकन गुनिया सारख्या रोगावर आपण मात केली आहे. तसेच आपण कोरोना संसर्गावर देखील मात करू.असे वक्तव्य केले तर मेडिकल क्षेत्रातील तज्ञाची कोरोना बाबतची पळापळ पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यासाठी साजुक तूप, चिकन, अंडी, नारळपाणी यांचा आहारमध्ये समावेश वाढवावा असे सांगितले.

डॉ अमृता वाकचौर यांनी सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार व्यवस्थापन याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी कडधान्य, भाजीपाला, फळे, मांस, दुग्धजन्य पदार्थ इ. आहारामध्ये समतोल वापर कसा असावा ते सांगितले.कार्यक्रमा दरम्यान पोषण थाळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये १७ महिलांनी सहभाग नोंदवला. त्यातून तज्ञांकडून ४ महिलांची उत्कृष्ट थाळी साठी निवड करण्यात आली. तसेच त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

प्रथम क्रमांक बारामती येथील कु. मोनाली थोरात यांना रु १००० व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक मळद येथील एकता महिला शेतकरी गट यांना रु ७०० व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक दोन महिलांमध्ये विभागून देण्यात आला. सौ नलिनी तनपुरे, माळेगाव व बाल विकास योजना, मळद यांना रु ६०० विभागून देण्यात आले.

यावेळी इफको कंपनी व केव्हीके बारामती मार्फत आरोग्यदायी भाजीपाला रोपे व बियाणे कीट मोफत देण्यात आले. या कार्यक्रमासाठी बारामती परिसरातून ६० महिला तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रतन जाधव यांनी केले. यामध्ये त्यांनी पुणे जिल्हामध्ये केव्हीके मार्फत पोषण आहार व परसबाग संदर्भात जनजागृती केली जाणार आहे असे सांगितले. बारामती तालुक्यातील मळद व जळगाव सुपे या अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे.

यावेळी ट्रस्टच्या प्रमुख गार्गी दत्ता, डॉ अमृता वाकचौर, आरोग्य व्यवस्थापक, प्रा. दिपाली संगेकर, गृह विज्ञान विभाग, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, पंचायत समिती बारामतीच्या काटेवाडी प्रमुख शुभदा भिलारे आणि केव्हीके विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव, उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा