शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात अनावरण

मुंबई, २३ जानेवारी २०२३ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज सोमवारी (ता. २३) सायंकाळी सहा वाजता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण होणार असून, विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीविषयी संध्याकाळी उशिरापर्यंत अनिश्चितता होती.

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासह राज ठाकरे, आदित्य ठाकरे; तसेच ठाकरे कुटुंबातील सर्वांना या सोहळयाचे आमंत्रण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याशी मी स्वत: बोललो असून, हा सोहळा अतिशय भव्यदिव्य असा होणार असल्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी सूचना केली होती. त्याला मंजुरी देण्यात आली होती. नागपूर येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात राहुल नार्वेकर यांनी ता. २३ जानेवारी रोजी तैलचित्र अनावरण सोहळा आयोजित करण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार उद्या हा सोहळा होत आहे. यावेळी राहुल नार्वेकर यांच्यासह विधानसभा उपाध्यक्ष उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, खासदार, आमदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत साशंकता
सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गट आणि ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे विधान भवनातील कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्फे दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार संध्याकाळी पाचच्या सुमारास उद्धव ठाकरे हे गेट वे ऑफ इंडियाजवळील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला वंदन करायला जातील. त्यानंतर षण्मुखानंद हॉल येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यालाही ते उपस्थित राहतील. विधिमंडळातील कार्यक्रम आज सायंकाळी सहा वाजता असल्याने उद्धव ठाकरे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा