भिवंडीत ओला चालकाची हत्या, उत्तर प्रदेशातील ५ जण ताब्यात

64

भिवंडी, १९ फेब्रुवारी २०२५ : उत्तर प्रदेशातील जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, एका ओला चालकाची हत्या करण्यात आलीय. अक्रम कुरेशी असं हत्या झालेल्या ओला चालकाचं नाव असून याप्रकरणी प्रेमाचं नाटक करणाऱ्या प्रेयसीसह पाच आरोपींना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती, तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांनी दिली.

खून करणारे जस्सी तिवारी, मोहम्मद कैफ, मोहम्मद रफिक कुरेशी, इसामुद्दीन रियाजुद्दिन कुरेशी, सलमान मो. शफिक खान, सुहेल अहमद कुरेशी हे पाचही आरोपी उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओला चालक अक्रम कुरेशी याचा आरोपी मोहम्मद कैफ सोबत उत्तर प्रदेशच्या प्रतापगड येथील जमिनीच्या वादातून जुलै 2022 मध्ये वाद झाला होता. या भांडणाचा राग मनात धरून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला.

आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून मोहम्मद कैफ याने आपली प्रेयसी असलेल्या जस्सी तिवारी हिची मदत घेतली. तिनं अक्रम कुरेशीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. १७ जानेवारी रोजी अक्रम कुरेशीला भेटीसाठी भिवंडी येथे निर्जन स्थळी बोलावून आधीच दबा धरून बसलेल्या चौघांनी अक्रम कुरेशीवर लोखंडी रॉड आणि दगडानं हल्ला करून हत्या केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एडके यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : पूनम सुपेकर-जठार