कर्नाटक, ३ डिसेंबर २०२१ : सरकारच्या लाख प्रयत्नांनंतरही देशात दोन रुग्णांना कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. ही दोन्ही प्रकरणं कर्नाटकात आढळून आली आहेत.
खुद्द भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याला दुजोरा दिलाय. कर्नाटकातील ओमिक्रॉन मुळे पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन रुग्णांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असं सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, एका संक्रमित रुग्णाला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत तर दुसऱ्या रुग्णाने पहिला डोस घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनची लागण झालेल्या ६६ वर्षीय व्यक्तीने दक्षिण आफ्रिकेला भेट दिली होती. तर ४६ वर्षांच्या दुसऱ्या रुग्णाने असा कोणताही प्रवास केला नव्हता आणि तो एक आरोग्य कर्मचारी आहे. दोन्ही रुग्णांना फक्त तापाची तक्रार असून ते पूर्णपणे बरे आहेत.
कर्नाटकमध्ये ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेल्या दोन रुग्णांपैकी एकाच्या संपर्कात आलेले पाच लोकही पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या हवाल्याने म्हटलंय की, कोरोनाचे ओमिक्रॉन प्रकार डेल्टा पेक्षा ५ पट जास्त धोकादायक आहे आणि इतरांपेक्षा वेगानं पसरू शकते. आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमिक्रॉन वेरिएंटने संक्रमित रूग्णांची ओळख पटली आहे आणि डब्ल्यूएचओने या प्रकाराला चिंतेच्या श्रेणीत ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेत या प्रकाराचा संसर्ग झालेला रुग्ण प्रथम आढळून आलं
देशातील सुप्रसिद्ध डॉक्टर आणि मेदांता हॉस्पिटलचे संस्थापक डॉ नरेश त्रेहान यांनी या प्रकाराच्या गांभीर्याबद्दल सांगितलं आहे की, कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने संक्रमित व्यक्ती १८ ते २० लोकांना पॉझिटिव्ह बनवू शकते. दुसरीकडं, देशातील कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली आहे की, गेल्या महिनाभरापासून देशात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत आहेत.
ते म्हणाले, ‘आता फक्त दोन राज्ये महाराष्ट्र आणि केरळमध्ये १० हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणं आहेत, जी देशातील एकूण संक्रमित प्रकरणांपैकी ५५ टक्के आहे.’ लव अग्रवाल म्हणाले की, कोरोना लसीचे दोन्ही डोस दिल्यानंतर देशातील सुमारे ४९ टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी झालं आहे.
ओमिक्रॉन प्रकारामुळं लोकांना संसर्ग झाल्याची बातमी समोर आल्यानंतरच केंद्र सरकारने १५ डिसेंबरपासून सुरू होणार्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा निर्णय पुढं ढकलला. देशात ओमिक्रॉन संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन अलर्ट जारी केला होता आणि सर्व राज्यांना बाहेरून येणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते. यानंतर महाराष्ट्र, झारखंडसह अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडं परदेशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे