भाजपाच्या वतीने ग्रामस्थांचे आभार व्यक्त करून गावाच्या विकासासाठी शुभेच्छा

उस्मानाबाद, ९ जानेवारी २०२१: गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ,आदर्श ग्राम निर्मिती साठी तसेच भांडणतंटामुक्त गाव होण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध घेणे हे अत्यंत गरजेचे आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह  पाटील व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सर्व ग्रामस्थांचे जाहीर पणे आभार मानले तसेच गावाच्या विकासासाठी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन देखील केले.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध करा आणि गावाच्या विकासासाठी भरघोस निधी घ्या, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी ग्रामस्थांना केले होते. या आवाहनाला ४२ ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अशा गावच्या विकासासाठी भरीव निधी भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध घेण्यासाठी व गावाला विकास निधी मिळण्याच्या दृष्टीने गावागावातील तरूणांनी, ग्रामस्थांनी तसेच विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेते पदाधिकारी आणि ज्यांनी या निवडणुकीतून मोठ्या मनाने माघार घेतली, अशाप्रकारे सर्व उमेदवारांनी सहकार्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना येणाऱ्या काळात सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले  यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड