मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडच्या वतीने छ. संभाजी महाराज जयंती साजरी

पुरंदर, दि. १४ मे २०२०: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने किल्ले पुरंदर येथील छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा भव्य-दिव्य सोहळा रद्द करून प्रातिनिधिक स्वरूपात अभिवादन करून हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले पुरंदर येथे मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. पाळणा, छबिना, पालखी सोहळा, मर्दानी खेळ, चित्त थरारक कसरती, शिवकालीन शस्रांचे प्रदर्शन, नाणी प्रदर्शन, पोवाडे, व्याख्यान अशा भरगच्च कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते, मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करून सर्व प्रकारचे धार्मिक, राजकीय, सामाजिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज जयंतीही घरातच राहून साजरी करण्याचे आवाहन विविध पातळ्यांवर करण्यात येत आहे.

गर्दी टाळावी आणि राज्यातील शंभूप्रेमींनी घरातच राहून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करावी, यासाठी शंभूप्रेमींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून ही जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाची महामारी गेल्यानंतर पुणे येथे भव्य-दिव्य स्वरूपात जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती देत घरात राहून कोरोनो विरुद्धचे युद्ध जिंकण्याचे आवाहन मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी केले, यावेळी सागर जगताप, संतोष हगवणे, आनंद जंगम आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा