मुंबई, २३ जानेवारी २०२३ : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ति’ विषयावरील चित्ररथ दिसणार आहे. या माध्यमातून नारी शक्ति राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्शित केला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे यापुर्वी ४० वेळा राजधानीत होणाऱ्या मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर झाले असून, यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्याच्यावतीने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ति’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ आहे.


महाराष्ट्र संताची आणि देवतांची भुमी आहे. महाराष्ट्रात महत्वाची साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची आंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तिपीठे आहेत. तर, वणीची सप्तशृंगी हे अर्ध शक्तिपीठ आहे. या शक्तिर्पीठांना स्त्री शक्तिचे स्त्रोत मानले जाते. यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहे.
या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. शुभ ऍड ही संस्था चित्ररथाचे काम करीत असून त्याला प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य कलाकारांचा चमु करीत आहे. हे काम आता अंतीम टप्प्यात आहे. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले आहे. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहीले आहे. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समुह येथील आहे, असेही चवरे यांनी यावेळी सांगितले
दरम्यान, यावर्षी महाराष्ट्रासह १७ राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांची १० अशी एकूण २७ चित्ररथे कर्तव्यपथावर झळकणार आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.