कोल्हापूर २० जून २०२३ : कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षापासून पोलीस आयुक्तालयाची मागणी होतेय, परंतु त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. अशातच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्यात स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने राजकारण तापले आहे. कोल्हापुरात आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी होत असताना, त्याकडे दुर्लक्ष करून हे कार्यालयच हलवण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. हे कार्यालय हलवल्यानंतर कोल्हापुरात गुन्हेगारी फोफावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ४० लाखाच्या आसपास आहे. यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासाठी आयुक्तालय असणे गरजेचे आहे, यासाठी वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. मागील सरकारच्या काळात कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतलेली तसेच कोल्हापुरातून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय स्थलांतरित होणार नाही असेही सांगण्यात आले होते.
कोल्हापूर मध्ये सध्या पोलीस आयुक्तालय तर नाहीच पण विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय सुद्धा पुण्यात स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे कार्यालय पुण्याला हलवल्यास कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस मनुष्यबळांची प्रचंड कमतरता भासणार आहे. गेल्या काही दिवसात कोल्हापूर परिसरात गुन्हेगारी वाढली असुन माफियाराज फोफावत आहे. संघटित गुन्हेगारी, सावकारी, दरोडे, महिलांवरील अत्याचार अशा गुन्ह्यांचा आलेख वाढतच आहे. या गुन्ह्यांना पायबंध घालणे आवश्यक आहे. पोलीस आयुक्तालय किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय असेल तरच अशा गुन्हेगार आणि अवैध गोष्टींवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर