महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी केलं संबोधित

मुंबई, १ मे २०२१: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्रदिन आणि कामगारदिना च्या शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जीवाचं बलिदान देणाऱ्या सर्व शहिदांना अभिवादन देखील केलं. या वर्षी देखील त्यांनी २०१० ला साजरा करण्यात आलेल्या महाराष्ट्र दिनाच्या भव्य सोहळ्याची आठवण करून दिली.

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असल्याचं यावेळी त्यांनी नमूद केलं. यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याची लसीकरणाची क्षमता रोज १० लाख एवढी आहे. मात्र, या वयोगटासाठी फक्त ३ लाख डोस मिळाल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं. या वयोगटातील ६ कोटी नागरिकांना २ डोस प्रमाणं १२ कोटी लसींची आवश्यकता आहे. मात्र, राज्याला उपलब्ध होणारी लस मर्यादित असल्यानं थेट लस केंद्रावर गर्दी करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं. लस केंद्रं ही कोविड प्रसाराची केंद्रं होऊ नयेत यासाठी काळजी घ्या आशा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना दिल्या.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंधांची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. येऊ शकणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्याची आणि ते कोविन ॲपला जोडण्याची किंवा राज्यांना त्यांचं ॲप तयार करू देऊन ते कोविन ॲपला जोडण्याची मान्यता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडं पत्राद्वारे मागणी केली आहे. कडक निर्बंधानंतर लगेचच रुग्ण संख्या कमी झाली नसली तरी मागील काही दिवसांपासून ती स्थिरावण्यास मदत झालीय. राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ देखील करण्यात आलीय. राज्यात १७०० मे.टन ऑक्सिजनचं नियोजन करण्यात आलं आहे. जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजची राज्यात तातडीनं अंमलबजावणी सुरु करण्यात आली असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा