श्रीनिवास खळे यांच्या जन्मदिनानिमित्त

श्रीनिवास खळे ह्यांचा जन्म ३० एप्रिल, १९२६ रोजी बडोदा येथे झाला. बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. श्रीनिवास खळे यांनी प्रथम कोरगावकरसाहेबांचे साहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली. ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळेसाहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले.

त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. खळे यांनी फारच थोड्या चित्रपटांना संगीत दिले आहे. त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नव्हते . भरपूर पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावले.

श्रीनिवास खळे यांनी फारशा चित्रपटांना संगीत दिलेले नसले तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळले होते . त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळजवळ १०० हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत. पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, सुलोचना चव्हाण पासून ते हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अरुण दाते, सुधा मल्होत्रा, सुरेश वाडकर, देवकी पंडित, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन ते अगदी लिटिल चॅम्प आर्या आंबेकर यांच्यापर्यंत कैक नामवंतांनी खळेसाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत.

विशेष म्हणजे महाराष्ट्र दिन जवळ आला आहे त्यासंबंधात देखील एक आठवण आहे. १ मे १९६० हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीते लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत. हे गीत शाहिर साबळे ह्यांनी गायले आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधली आहे. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा