पीके रोझीची १२० वी जयंती : गुगलने बनवले अभिनेत्रीचे डूडल!

तिरुअनंतपुरम, १० फेब्रुवारी २०२३ :गुगलने आज डूडलमार्फत मल्याळम सिनेमातील पहिली आघाडीची महिला अभिनेत्री पीके रोझीचा सन्मान केला आहे. ज्या काळात समाजातील अनेक घटक विशेषतः महिलांसाठी कला सादर करणे अत्यंत अवघड होते, त्या काळात रोझीने विगाथाकुमारन (द लॉस्ट चाइल्ड) या मल्याळम चित्रपटातील तिच्या भूमिकेने समाजातील सर्व अडथळे तोडले. आजही तिची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

  • कक्करीस्सी नाटकमचे घेतले शिक्षण

रोझीचा जन्म १९०३ मध्ये आजच्याच दिवशी केरळच्या तिरुअनंतपुरम येथे झाला होता. तिचे कुटुंब तिरुवनंतपुरमच्या नादानकोडे येथे राहत होते. रोझीला अभिनयाची आवड लहान वयातच लागली. तिने पारंपारिक स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये कक्करीस्सी नाटकमचे शिक्षण घेतले. हा लोककला प्रकार मूळतः तामिळनाडूचा आहे. ह्या लोककलेत मल्याळम आणि तमिळ संस्कृतीचे संगीत नाटकाच्या स्वरूपात मिश्रण आढळते. या लोककलेतील कथा शिव आणि पार्वती यांच्याभोवती फिरतात. जे भटक्या जमातीतील भविष्य सांगणारे कक्कलन आणि कक्कठी म्हणून पृथ्वीवर येतात.

  • भारतीय सिनेमातील पहिली दलित अभिनेत्री

१९३० मध्ये रोझीने जेसी डॅनियल दिग्दर्शित विगथाथाकुमारन चित्रपटात एका उच्चवर्णीय नायर महिलेची भूमिका करण्याचे धाडस केले होते. जेसी डॅनियलने सुरुवातीला सुश्री लाना या मुंबईतील महिला अभिनेत्रीला विगथाकुमारनमध्ये अभिनय करण्यासाठी आणले. तेव्हा केरळमधील कोणतीही महिला चित्रपटात काम करायला तयार नव्हती. त्याने तिच्यासोबत चित्रपटाचे थोडेसे चित्रीकरण देखील केले. परंतू ती त्याच्या अपेक्षांना पूर्ण करू शकली नाही. त्या नंतर या भूमिकेसाठी पीके रोझीचा विचार केला गेला.

  • पाहिल्याच चित्रपटावरुन विवाद

तिरुअनंतपुरमच्या कॅपिटल सिनेमात जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा एका दलित महिलेने नायर महिलेची भूमिका केल्यामुळे प्रेक्षक संतापले होते. या चित्रपटात रोझीचा प्रियकर तिने केसात घातलेल्या फुलाचे चुंबन घेताना एक दृश्य होते. यामुळे लोक इतके संतापले की त्यांनी स्क्रीनवर दगडफेक करून त्याचे नुकसान केले.
त्यानंतर एका दलित महिलेने उच्चवर्णीय महिलेची भूमिका केल्याने संतप्त झालेल्या उच्चवर्णीयांनी तिचे घर जाळले. जीवाच्या भीतीने रोझीने तामिळनाडूला जाणाऱ्या लॉरीमध्ये पळ काढला. त्यानंतर तिने लॉरी चालक केशवन पिल्लईशी लग्न केले आणि तिचे उर्वरित आयुष्य ‘राजम्मल’ म्हणून जगले.

१९८८ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी रोझीचा मृत्यू झाला. आताच्या पिढीला रोझीच्या नावाचा विसर पडू नये म्हणून मल्याळम चित्रपट उद्योगातील वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह (WCC) ने अलीकडेच घोषणा केली आहे की, ते पीके रोझीच्या नावाने एक फिल्म सोसायटी सुरू करणार आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा