जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मांजरी येथे ‘जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट’ने केले व्हीलचेअरचे वाटप.

पुणे, ३ डिसेंबर २०२२ : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टने मांजरी येथे आज विविध कार्यक्रम साजरे केले. सदर कार्यक्रमात उपस्थित दिव्यांगांनी लोकप्रतिनिधी व तहसीलदारांसमोर विविध मागण्या केल्या. ‘उठ दिव्यांगा, जागा हो’ अशी घोषणाही यावेळी देण्यात आली.

यातील प्रमुख कार्यक्रमात, दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर व इतर उपयोगी वस्तूंचे वाटप, दिव्यांग बांधवांचे आरोग्य शिबिर; तसेच अतितीव्र व आजारी बांधवांना आर्थिक मदत, दिव्यांगावर यशस्वीपणे मात केलेल्या व्यक्तींचा सन्मान असे विविध उपक्रम करण्यात आले.

‘जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट’चे दत्तात्रय ननावरे यांनी याप्रसंगी प्रास्ताविक केले; तसेच समाजातील वंचित दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा व त्यांच्या कलागुणांनाही वाव मिळावा, अशी मागणी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याकडे केली.

या कार्यक्रमात आमदार चेतन तुपे, तहसीलदार तृप्ती कोलते, मांजरीचे सरपंच, उपसरपंच आणि गावकरी तसेच मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा