मुंबई, दि. ३० मे २०२०: देशामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यामध्ये कोविड १९ रुग्णचे आढळून आले आहेत. त्यातही मुंबई शहर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण देशांमध्ये सर्वात जास्त रुग्ण असणारे शहर झाले आहे. परंतु काल या संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने काल उच्चांक गाठला आहे. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ मुंबईमध्येच ७३५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे, आतापर्यंत २६९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, असहीे त्यांनी सांगितले.
राज्यात आज २६८२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ६२,२२८ अशी झाली आहे. असे असून देखील काल नवीन ८३८१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण ३३,१२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, असं टोपे यांनी सांगितलं. दुसरीकडे ३१ मे रोजी देशव्यापी चौथा लॉकडाऊन संपणार आहे. मात्र मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी लक्षात घेता या शहरातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात परवा फक्त (दि.२८)रोजी केवळ ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. परवापर्यंत घरी गेलेल्यांचा आकडा हा १८ हजार ६१६ इतका होता. तो काल एकदम २६ हजार ९९७ वर पोहोचला. काल जितके रुग्ण सापडले त्याच्या तिप्पट रुग्ण घरी गेले.
न्यूज अनकट प्रतिनिधी