मुंबई, २३ ऑक्टोंबर २०२२: काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद ह्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता दिपाली सय्यद यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली होती, असे सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकात्मक विधान केले आहे.
दीपाली सय्यद यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वृत्तवाहिनी माध्यमांची संवाद साधला
सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर दिपाली सय्यद ह्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर दिपाली सय्यद म्हणाल्या, शिवसेनेत सुषमा अंधारे आल्या म्हणून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. परंतु प्रत्येकजण आपलं काम करीत असतो. मी जे करतेय ते कामातून लोकांसमोर येत आहे.
आपण केवळ कृतीतून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला नेता सपोर्ट करीत असेल तर आपण त्यांच्याबरोबर जायलाच पाहिजे. तसेच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती. भविष्यातही त्यांनी एकत्र यावे, असे मला वाटते,
उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे, त्यांच्या दौऱ्याला यश मिळायला पाहिजे माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी अगोदरच या दौऱ्यांना सुरुवात करायला पाहिजे होती. माझे पदाधिकारी कार्यकर्ते किती मजबूत आहेत, हे नेत्याने तपासले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर आज शिवसेना पक्षात फूट पडली नसती तसेच मागील काही दिवसांपासून माझा आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचत नाही. याबद्दल मी लवकरच बोलेन. मातोश्रीपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागत नाही. तसेच लोकांच्या मनात आहे की मी शिंदे गटात जायला पाहिजे असेही दीपाली सय्यद यांनी सांगितल आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिपाली सय्यद यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दीपाली सय्यद यांनी कोणाला भेटावे का भेटावे? हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये एक स्पर्धा लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी जेवढे चुकीचे मत व्यक्त कराल तेवढे मोठे पद मिळेल, असा प्रकार सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली की सत्य साध्य होते. त्यामुळे दीपाली सय्यद असो किंवा अन्य कोणी, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे