महाड दुर्घटनेतील एक आरोपी ताब्यात

महाड, २९ ऑगस्ट २०२०: महाडच्या काजळपुरा परिसरात २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० ते ८० लोक दबले होते. या घटनेनंतर स्थानिक लोक, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं होतं. आता या घटनेविषयी आणखी एक बातमी समोर येत आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेला एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या इमारतीच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित होत होते. अलीकडेच बांधण्यात आलेली ही इमारत निष्कृष्ट दर्जाच्या बांधकाम कार्यामुळे कोसळली. आज अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव युनिस शेख असं आहे. सदर ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा या इमारतीच्या बिल्डरचा स्थानिक सहकारी होता. युनिसनेच या इमारतीतील सदनिकांची विक्री केली होती. युनिसच्या ओळखीनंच अनेक जणांनी या इमारतीमध्ये सदनिका विकत घेतल्या होत्या. या इमारतीत ४० कुटुंबे राहत असल्याची माहिती समोर आली होती.

सध्या महाड कोर्टानं त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये तर जखमींना ५० हजारांची मदत करण्याची घोषणा मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा