नागपूर, दि. ११ सप्टेंबर २०२२: दोन वर्ष कोरोना कालखंडाच्या विश्रांतीनंतर, संपूर्ण राज्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर गणरायाला निरोप ही उत्साहवर्धक वातावरणात मनोभावे पूजाअर्चा करून जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. या विसर्जन सोहळ्यामध्ये महाराष्ट्रात ठीक ठिकाणी अनेक दुर्दैवी दुर्घटना घडल्याचे ही समोर आले आहे. अशीच एक घडलेली घटना नागपूरमधील विसर्जन मिरवणूक सोहळ्यामध्ये समोर आली आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुकी वेळी, कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या घटना घडत असतात. कितीतरी ठिकाणी गणेश विसर्जना वेळी पाय घसरून किंवा गणपती बुडवताना दुर्घटना घडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु नागपूर मध्ये विसर्जन मिरवणुकी वेळी मिरवणुकीत हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचंबित करणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
गणपती विसर्जनाची मिरवणूक चालू असताना, डीजे वर गाणी वाजवण्यावरुन वाद उफाळून आला. यावेळी झालेल्या वादामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. हा वाद इतका वाढला की आरोपींनी डीजे मालक कल्पेश बावनकुळे यांची हत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर