एक ओटीपी सांगितला अन् खात्यातून ७ लाख ६० हजार गायब; पुण्यातील घटना

40

पुणे, २४ जानेवारी २०२३ : क्रेडिट कार्डच्या ऑफर; तसेच पर्सनल लोनच्या बहाण्याने मंगरुळ (ता. अमळनेर, जि.जळगाव) येथील एका तरुणाची ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी (ता. २०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ओटीपी सांगितल्यावर फोनवर बोलता-बोलताच तरुणाचे बँक खाते काही मिनिटांत रिकामे झाल्याचा प्रकार घडला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी, की मंगरुळ (ता.अमळनेर, जि. जळगाव) येथील मूळ रहिवासी मिलिंद प्रकाश पाटील (वय २३) हा तरुण सद्य:स्थितीत पुण्यातील हिंजवडी येथे वास्तव्यास आहे. मिलिंद यास त्याच्या मोबाईलवर १८ जानेवारी ते १९ जानेवारीदरम्यान अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या संबंधित व्यक्तीने मिलिंद यास पर्सनल लोन; तसेच क्रेडिट कार्डच्या वेगवेगळया ऑफरबद्दल माहिती देत मिलिंद याचा विश्वास संपादन केला. यादरम्यानच त्याला ओटीपी पाठवून तो विचारला. मिलिंद याने ओटीपी सांगितल्यावर या ओटीपीच्या आधारावर संबंधितांनी मिलिंद याच्या बँक खात्यातील तब्बल ७ लाख ६० एवढी रक्कम दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्स्फर करून घेतली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर मिलिंद पाटील याने शुक्रवारी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील