माणसाने आयुष्यात एकदा तरी पंढरपुरात येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले पाहिजे- शिवमहापुराण व्याख्याते पंडित प्रदीप मिश्रा

पंढरपूर २७ डिसेंबर २०२३ : पंढरपूर नगरीत श्री हरिहर शिव महापुराण कथा सोहळ्याचा दुसरा दिवस काल अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सिंहोर येथील सुप्रसिद्ध पंडित पूजनीय श्री.प्रदीप मिश्रा महाराज यांच्या सुश्राव्य वाणीत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन हा सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात पूजनाने झाली. त्यानंतर आजी माजी सैनिकांच्या हस्ते भगवान महादेवाची आरती करण्यात आली. देवभक्ती आणि देशभक्तीचे एकत्रित दर्शन आजच्या कार्यक्रमातून पाहायला मिळाले. यानंतर महाराजांच्या सुश्राव्य कथेतून भगवान महादेव आणि विठ्ठलाचा महिमा वर्णन झाले. जो कोणी भारतात जन्माला आला आहे त्याने एकदा तरी विठ्ठलाच्या दर्शनाला आलेच पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी अशिर्वाचनात केले.

या महापुराण सोहळ्यात विशेष बाब ठरत आहे ती म्हणजे यजमान विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा उस्फुर्त सहभाग. जेवण बनविण्यापासून ते स्वच्छता कार्यापर्यंत सर्व बाबतीत त्यांचा पुढाकार दिसून येत आहे. भव्य मंडपामध्ये प्रत्येकाच्या भोजनाची आस्थेवाईक चौकशी करण्यापासून ते शेवटचा माणूस झोपेपर्यंत अभिजीत पाटील एका आदर्श यजमानाच्या भूमिकेत अत्यंत समर्पित भावनेने काम करताना दिसत आहेत.

आज दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर भगवान महादेवाचा वेश धारण करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि तीही त्यांनी समर्थपणे पार पडली त्यांच्या महादेव रुपाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दि.३१ डिसेंबर पर्यंत ही कथा दररोज दुपारी १ वाजता होणार असून आयोजक यजमान श्री.अभिजीत पाटील यांनी अधिकाधिक संख्येने भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिल्लारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा