सहाव्या धम्मविचार साहित्य संमेलनाच्या उदघाटकपदी ॲड. विवेकानंद घाटगे यांची निवड

कोल्हापूर, २७ डिसेंबर २०२३ : ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी अध्यक्ष ॲड. विवेकानंद घाटगे यांची रविवार दि. १४ जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या सहाव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या उदघाटकपदी निवड करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ज्येष्ठ शाहीर संभाजी भगत, सिनेअभिनेते मिलिंद शिंदे, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, धम्म अभ्यासिका विजया कांबळे आदी मान्यवर यापूर्वीच्या साहित्य संमेलनाचे उदघाटक राहिले आहेत.
उदघाटकपदाच्या निवडीचे पत्र धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल यांनी ॲड. विवेकानंद घाटगे यांना दिले.धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था तथागत बुद्धांच्या मानवतावादी विचारांना घेऊन काम करणारी महत्त्वपूर्ण अशी संस्था असून या संस्थेच्या वतीने धम्म विचारांचा जागर करण्यासाठी दर वर्षी धम्मविचार साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.

या वर्षीच्या सहाव्या संमेलनाच्या उदघाटक म्हणून ॲड. विवेकानंद घाटगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून ॲड. विवेकानंद घाटगे स्पष्ट, परखड, संयमी व कायद्याचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जातात. विविध सामाजिक प्रश्नासह त्यांनी कोल्हापुरात हायकोर्टाचे सर्किट बेंच व्हावे म्हणून निकराचा लढा दिला आहे.नीतीप्रज्ञ न्यायरक्षक,समाजभूषण यासह सामाजिक क्षेत्रातील मानाचे व सन्मानाचे पंधराहुन अधिक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. ॲड. विवेकानंद घाटगे यांची धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सहाव्या धम्मविचार साहित्य संमेलनाच्या उदघाटकपदी निवड झाल्याबद्दल सामाजिक क्षेत्रात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा