सुरत, २४ सप्टेंबर २०२०: सुरत मधील हाजिरा येथे असलेल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) कंपनीला भीषण आग लागल्याची बातमी समोर आलीय. याची खबर मिळताच अग्निशामक दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, कित्येक किलोमीटर लांबुन देखील हे दृश्य पाहिलं गेलं. रात्री दोनच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. तथापि, अग्निशामक दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.
या आगीशी संबंधित व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की हि आग दोन ठिकाणी लागलेली आहे. ओएनजीसी कंपनीमध्ये अशी आग लागणं ही काही नवीन घटना नाही. मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये देखील मुंबईस्थित ओएनजीसी कंपनी मध्ये आग लागली होती. त्यावेळेची आग नवी मुंबई मध्ये असलेल्या ओएनजीसीच्या कोल्ड स्टोरेज प्लांटमध्ये लागली होती.
दरम्यान, सुरत मध्ये झालेल्या या कंपनीच्या स्फोटामुळं कंपनीच्या जवळच्या परिसरात रहिवासी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी असं सांगितलं की स्फोट होताच त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा देखील हादरल्या होत्या. यावरून या स्फोटाची भीषणता लक्षात येते. आगीच्या भडक्यासह धुराचे मोठे लोळ देखील आकाशात जाताना दिसत होते.
कंपनीनं आपल्या निवेदनात स्पष्टीकरण दिलं आहे की, हाजरास्थित कंपनीच्या एका भागामध्ये रात्री आग लागल्याची घटना घडली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सुरतचे जिल्हाधिकारी डॉ. धवल पटेल म्हणाले की, प्लांटमध्ये सलग ३ स्फोट झाले आणि त्यामुळं आग लागली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे