नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला; लासलगाव बाजार समितीत लिलाव पाडले बंद

11

नाशिक, २७ फेब्रुवारी २०२३ : कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरुन ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा, यासाठी निदर्शने करीत आहे. मात्र, निदर्शने करूनही कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आता कांद्याचे लिलावच बंद पाडण्याचा निर्णय घेत लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

आज सकाळपासूनच लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले असून कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. शासन किमान दहा ते पंधरा रुपये प्रतिक्विंटल विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देणार नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने कांधाचे लिलाव होऊ देणार नाही, अशी भूमिका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी घेतली आहे.

तर दुसरी मागणी ही कांद्याला ३० रुपये प्रतिकिलो हमीभाव द्यावा, अशी मागणी करीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव सुरू होणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर