सिसोदिया यांची आज दारू धोरण घोटाळाप्रकरणी न्यायालयात हजेरी

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०२३ : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया यांना दारू धोरण घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ‘सीबीआय’ने ८ तासांच्या चौकशीनंतर सिसोदियांना अटक केली आहे.

‘सीबीआय’ उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज न्यायालयात हजर करणार आहे. आयपीसी (भारतीय दंड संहिता) कलम १२०-बी (गुन्हेगारी कट), ४७७-ए (फसवणूक करण्याचा हेतू) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम-७ अंतर्गत ही अटक करण्यात आली आहे.

जुलै २०२२ मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली होती . सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. यानंतर ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ने सिसोदियांविरुद्ध तपास सुरू केला असताना नव्या निविदेनंतर भाजपने दारू ठेकेदारांना १४४ कोटी माफ केल्याचा आरोप केला आहे.

सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे दुसरे मंत्री आहेत ज्यांना एका वर्षाच्या आत केंद्रीय एजन्सीने अटक केली आहे. यापूर्वी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मे २०२२ मध्ये अटक केली होती. ते अजूनही तुरुंगात आहेत. गेल्या रविवारी सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते; पण चौकशीत सहकार्य करीत नसल्याचा ठपका ठेवत ‘सीबीआय’ने मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. दरम्यान, सिसोदियांच्या अटकेविरोधात आप आज देशभरात निदर्शने करणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा