‘अनलॉक लर्निग’ उपक्रमात केवळ दोनच शासकीय आश्रमशाळांचा सहभाग

9

वर्धा, १९ नोव्हेंबर २०२० : कोरोनाच्या प्रकोपामुळे सर्वच शाळा, महाविद्यालये अद्यापही बंद असल्याने शाळांकडून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. या काळात सर्वाधिक नुकसान निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचं होतांना दिसतं. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांनी ‘अनलॉक लर्निंग’ हा उपक्रम चालवला आहे.

वर्ध्याच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सहा निवासी आश्रम शाळा आहेत. त्यामध्ये दोन शासकीय आहेत तर चार खाजगी अनुदानित. ‘अनलॉक लर्निग’ उपक्रमात मात्र केवळ दोनच शासकीय आश्रमशाळांनी सहभाग नोदविल्यानं २१३ विद्यार्थ्यांनाच त्याचा लाभ झाला आहे.

अनुदानित खाजगी शाळांतले २ हजार २०० विद्यार्थी मात्र त्यापासून वंचित राहिलेत. दोन्ही सरकारी शाळांतले १४ शिक्षक, १२ गृहपाल आणि ९ शिक्षकेतर कर्मचारी अनलॉक लर्निंग उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता परिश्रम घेत आहेत. शाळा पातळीवर दोन मदत कक्ष स्थापन केले असून ५६ सदस्यांचे जवळपास ६६ स्थानिक साधन समूह कार्यरत आहेत.

विद्यार्थ्यांकडून मातीपासून विविध आकाराच्या वस्तू तयार करणे. भूमितीय आकृत्या तयार करणे. त्यांना मराठी, इंग्रजी किंवा गोंडी भाषेत नाव देणे यासह चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, गावात येणा-या पाण्याच्या स्त्रोताबाबत नकाशाव्दारे, चित्राव्दारे किंवा निबंधाव्दारे माहिती जाणून घेणे, आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच आरोग्य आणि आहाराबाबत माहिती दिली जाते.

सप्टेंबर महिन्यातील पोषण आहार सप्ताहाअंतर्गत रानभाज्या, त्या बनविण्याची पद्धत आणि त्यातील जीवनसत्वाची माहिती देण्यात आली आहे. अनुदानित आश्रमशाळा मात्र अनुदान लाटण्यातच धन्यता मानत असून शिक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. ८८० विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वितरण मात्र करण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा