अभ्यासिका खुल्या करा; उपायुक्त नितीन कापडणीस यांना अभाविप ची मागणी

मालेगाव, २३ ऑक्टोबर २०२०: राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने सर्व आस्थापना सुरू करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने परवानगी दिली आहे. परंतु ज्ञानाचे पवित्र ठिकाण ग्रंथालय व अभ्यासिका बंद आहेत. त्या तत्काळ सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उपायुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘राज्यात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. याबरोबर एमपीएससी व विविध स्पर्धा परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ग्रंथालय व अभ्यासिका यांची गरज असताना राज्य सरकार उदासीन आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्याची सरकार परवानगी देत आहे. सध्या ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी दिली आहे. हे सरकार मद्यालय सुरू करण्यासाठी आग्रही आहे मात्र ज्ञानालय नाही.’

‘ज्ञानालय बंद आणि माद्यालय सुरू’ यातून राज्याची दिशा कुणीकडे चालू आहे, हे दिसून येत असल्याचे मालेगाव शहरमंत्री स्वराज निकम यांनी म्हटले आहे. यावेळी मालेगाव शहर संघटन मंत्री सचिन लांबुटे, शहर सहमंत्री तन्वी वैद्य, मालेगाव तालुका प्रमुख किरण शेलार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शुभम लोंढे व महाविद्यालय संपर्क प्रमुख कुणाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

2 प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा